ऐन मशागतीच्या हंगामात बळीराजाला दिलासा; आरसी बुक दाखवा, ४० लिटर डिझेल कॅनमध्ये भरा – जिल्हाधिकारी विकास मीना यांचा मोठा निर्णय
यवतमाळ जिल्ह्यात डिझेल तुटवड्याच्या अफवांदरम्यान जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ट्रॅक्टर आणि आरसी बुक सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना ४० लिटर डिझेल कॅनमध्ये देण्यास मंजुरी देण्यात आली असून काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत.
रवि वाघमारे | जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
यवतमाळ : मशागतीच्या ऐन हंगामात डिझेल तुटवड्याच्या अफवा आणि चर्चांमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि डिझेलचा काळाबाजार रोखण्यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.
नवीन निर्णयानुसार, शेतकऱ्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर आणि वाहनाचे मूळ आरसी बुक पेट्रोल पंपावर सादर केल्यास त्यांना ४० लिटर डिझेल कॅनमध्ये भरण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मशागतीच्या कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
प्रशासनाच्या आदेशानुसार, संबंधित शेतकऱ्याने ट्रॅक्टरसह पेट्रोल पंपावर हजर राहून वाहनाचे मूळ आरसी बुक दाखविल्यानंतर पडताळणी करून ४० लिटर डिझेलची कॅन दिली जाईल.
मात्र, कोणतीही व्यक्ती ट्रॅक्टर किंवा शेतीचे वाहन न आणता केवळ रिकामी कॅन, बाटली किंवा डबा घेऊन आल्यास पेट्रोल किंवा डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इंधनाचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसामान्य वाहनधारकांसाठी पेट्रोल आणि डिझेल हे संबंधित वाहनाच्या अधिकृत टाकीतच भरले जाईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, सर्व पेट्रोल पंप चालक आणि व्यवस्थापकांना सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवणे आणि फुटेजचा ४० दिवसांचा बॅकअप जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणी समितीला आवश्यकतेनुसार हे फुटेज तपासता येणार आहे.
डिझेल-पेट्रोलची साठेबाजी, कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा काळाबाजार रोखण्यासाठी तहसीलदारांच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके दर आठवड्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे तपासणी अहवाल सादर करणार आहेत.
रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
तसेच, प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध इंधन साठा, कंपनीकडून प्राप्त झालेला पुरवठा आणि एकूण मागणी याची माहिती ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी फलकाद्वारे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन, शेतकऱ्यांची अडवणूक किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.
“प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बळीराजाला कुठेही कमी पडू देणार नाही,” असा स्पष्ट संदेश जिल्हा प्रशासनाने या निर्णयातून दिला आहे.