भोंदूगिरीचे राज्यात अर्धशतक; दोन महिन्यांत ५० भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूबाबांविरोधातील कारवायांना वेग आला असून अवघ्या सव्वा दोन महिन्यांत ५० जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.

May 29, 2026 - 16:54
 0  15
भोंदूगिरीचे राज्यात अर्धशतक; दोन महिन्यांत ५० भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल
भोंदू बाबा, अशोक खरात प्रकरण, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

नाशिक ब्युरो |

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रभर भोंदूबाबांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. गेल्या सव्वा दोन महिन्यांत राज्यात तब्बल ५० भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वाधिक ५ गुन्हे नाशिक जिल्ह्यात नोंदविण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली.

राज्यातील या ५० प्रकरणांपैकी बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली मानसिक छळ झाल्याचे उघड झाले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला आणि पुरुष दोघांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अनेक पीडित महिलांना पुढे येऊन तक्रार करण्याचे धाडस मिळाले आहे. सामाजिक प्रतिष्ठा, भीती आणि दबावामुळे अनेक पीडित आजही समोर येण्यास घाबरत असल्याचे अंनिसने म्हटले आहे. मात्र खरात प्रकरणानंतर न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाल्याने इतर पीडितांनीही पुढे येण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. विशेष म्हणजे विविध धर्मांतील भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ एका धर्मापुरते मर्यादित असल्याचा आरोपही फेटाळला गेला असल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले.

अंधश्रद्धेमुळे होणारी फसवणूक थांबविण्यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तब्बल १८ वर्षे संघर्ष केला. त्यानंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.

अंनिसच्या मते, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासन यंत्रणा अनेकदा अपयशी ठरत असली तरी संघटना आपल्या मर्यादित क्षमतेतून जनजागृती, प्रबोधन आणि प्रचाराचे काम सातत्याने करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होण्यास मदत झाली आहे.

राज्यात दाखल झालेल्या ५० गुन्ह्यांमध्ये नाशिक, पुणे, मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, अकोला, धुळे, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, सांगली आणि संभाजीनगर जिल्ह्यांतील कथित भोंदू बाबांचा समावेश आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.