देवाची उरुळी घनकचरा डेपोची आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पाहणी; बायोमायनिंग कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी देवाची उरुळी येथील घनकचरा व्यवस्थापन डेपोची पाहणी करून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बायोमायनिंग प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने आणि तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे, दि. २९ मे २०२६ : महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी देवाची उरुळी येथील घनकचरा व्यवस्थापन डेपोला भेट देत तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी बायोमायनिंग प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कचरा व्यवस्थापनाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये तसेच परिसरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.
या दौऱ्यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार, श्री. कैलास केंद्रे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
तसेच देवाची उरुळी-फुरसुंगी नगरपरिषदेचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही यावेळी उपस्थित राहून परिसरातील विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
महापालिका प्रशासनाकडून बायोमायनिंग प्रक्रियेला गती देत पर्यावरणपूरक आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
