पश्चिम बंगाल फायरींग आणि ब्लास्ट प्रकरणातील मुख्य आरोपी मुंबईतून ताब्यात; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
पश्चिम बंगालमधील हावडा येथे दाखल फायरींग आणि स्फोटक प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ पथकाने देवनार परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी मुंबईत लपून राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई | दि. २१ मे २०२६
पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात दाखल फायरींग आणि स्फोटक प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ पथकाने देवनार परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.
माहितीनुसार, दिनांक ७ मे २०२६ रोजी पश्चिम बंगालमधील शिबपुर पोलीस ठाण्यात फायरींग आणि स्फोटक पदार्थ प्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि इतर संशयित गुन्ह्यानंतर फरार झाले होते.
दरम्यान, आरोपी मुंबईतील देवनार परिसरातील एकता एसआरए इमारतीत लपून राहत असल्याची खात्रीलायक माहिती मुंबई गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ६ पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मानवी माहिती प्रणालीचा वापर करत आरोपींचा शोध घेत कारवाई केली.
या कारवाईत मुख्य सूत्रधारासह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित आरोपींचा पश्चिम बंगालमधील फायरींग आणि ब्लास्ट प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
शमीम अहमद अब्दुल रशीद (वय ४०) – शिबपुर, हावडा, पश्चिम बंगाल
जमील अख्तर अली (वय ४३) – शिबपुर, हावडा, पश्चिम बंगाल
अफताब अनवर खुर्शीद अनवर (वय ४४) – शिबपुर, हावडा, पश्चिम बंगाल
सदर आरोपी विविध फायरींग आणि स्फोटक पदार्थ प्रकरणांमध्ये शिबपुर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सुशांत सावंत आणि कक्ष ६ मधील विशेष पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील शिबपुर पोलीस ठाण्याचे पथक मुंबईत दाखल झाले असून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1