उष्णतेवर गडचिरोली जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज; रुग्णालयांमध्ये २४ तास विशेष सुविधा उपलब्ध
गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ‘एक्स्ट्रीम हीट वेव्ह’ परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून प्रखर उष्णतेमुळे ‘एक्स्ट्रीम हीट वेव्ह’ अर्थात तीव्र उष्णतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवत संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास कार्यरत ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाकडून उष्णतेशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक औषधसाठा, आयव्ही फ्लुईड्स आणि इतर वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या तीव्र उन्हात अनावश्यक बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः शेतात किंवा बाहेरील कामे करणाऱ्या नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, हलक्या रंगाचे सैल कपडे वापरणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार उष्माघातामुळे शरीराचे तापमान अचानक वाढणे, चक्कर येणे, मळमळ होणे, डोकेदुखी, अशक्तपणा, घाम कमी येणे किंवा शुद्ध हरपणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरावी. तसेच चहा, कॉफी किंवा जास्त साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि ग्रामीण रुग्णालये पूर्णतः सज्ज ठेवण्यात आली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्याशी संबंधित गंभीर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात तात्काळ उपचार घ्यावेत किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

