खरीप हंगाम २०२६ विशेष मोहिमेसाठी कृषी विभागाचे आवाहन; आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर
कृषी विभाग गडचिरोली यांच्या वतीने खरीप हंगाम २०२६ विशेष मोहीम राबविण्यात येणार असून एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, जैविक पद्धती आणि विविध प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
गडचिरोली येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६ विशेष मोहीम राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनवर आणि परिणामी कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.
या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासोबतच विविध आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
धान, कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी जैविक बीजप्रक्रिया, सरी-वरंबा पद्धत, आंतरपीक पद्धती, ट्रायकोकार्ड, रायकोकार्ड, अॅझोला वापर, श्री पद्धत, ड्रम सिडिंग आणि शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर यावर विशेष भर दिला जाणार आहे. कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना गावनिहाय उद्दिष्टे निश्चित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
तसेच, मोहिमेदरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि अनुभव प्रसिद्ध करून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यात येणार आहे.
प्रीती म. हिरळकर यांनी सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागास सहकार्य करून आधुनिक शेती पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0