गडचिरोली जिल्हा रुग्णालयात प्रथमच यशस्वी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि डॉ. छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शस्त्रक्रियेमुळे दुर्गम भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली, दि. ११ : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ही पहिलीच अशा प्रकारची शस्त्रक्रिया असून, त्यामुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंग रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचारांचे नवे दालन खुले झाले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि ऑपरेशन थिएटरमधील परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही यशस्वी कामगिरी साध्य झाली.
खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणारी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया आता शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या, “जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या मेहनतीचे फलित आहे.”
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांनीही संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करत, भविष्यात अशा प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया नियमितपणे राबविल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
