विदर्भातील चार द्रुतगती महामार्गांना मंजुरी; गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला चालना
विदर्भातील ५४७ किलोमीटर लांबीच्या चार द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना राज्याच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गडचिरोलीच्या औद्योगिक आणि खनिज विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांनाही हिरवा कंदील देण्यात आला.
विदर्भ प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत विदर्भातील ५४७ किलोमीटर लांबीच्या चार प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम सीमांना जलद वाहतुकीद्वारे जोडण्यास मदत होणार असून गडचिरोलीच्या औद्योगिक आणि खनिज विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देताना नवेगाव मोरे ते सुरजागड हा मार्ग खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले. तसेच हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
या बैठकीत पुढील चार महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली :
१. नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग
एकूण लांबी : १६२.३७७ कि.मी.
मार्ग : गवसी मानपूर (नागपूर) ते सावरी (गोंदिया)
लेन : ३+३
इंटरचेंज : ९
जोडले जाणारे जिल्हे : नागपूर, भंडारा, गोंदिया
२. भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग
एकूण लांबी : ९४.२४१ कि.मी.
मार्ग : बोरगाव (भंडारा) ते ऋणमोचन (चंद्रपूर)
लेन : ३+३
इंटरचेंज : ६
जोडले जाणारे जिल्हे : भंडारा, गोंदिया, गडचिरोली
३. नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग
एकूण लांबी : २०४.७९९ कि.मी.
मार्ग : सेलडोह (वर्धा) ते नवेगाव मोरे (चंद्रपूर)
लेन : २+२
इंटरचेंज : ७
जोडले जाणारे तालुके : नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील ९ तालुके
४. नवेगाव मोरे – कोनसरी ते सुरजागड ग्रीनफिल्ड रस्ता
एकूण लांबी : ८५.७६५ कि.मी.
मार्ग : नवेगाव मोरे (चंद्रपूर) ते मंगेझरी (गडचिरोली)
लेन : २+२
जोडले जाणारे तालुके : चंद्रपूर आणि गडचिरोलीतील ४ तालुके
या चारही प्रकल्पांची एकूण बांधकाम किंमत सुमारे ५१ हजार ९०६ कोटी रुपये असून, कामाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे.
हे सर्व प्रकल्प सप्टेंबर २०२८ ते डिसेंबर २०२८ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
