पंतनगर मनपा शाळा क्र. २ ची जागा वाचवण्यासाठी घाटकोपरकरांचा जनआक्रोश; जागा हस्तांतरण प्रस्तावाविरोधात भाजपचे आंदोलन

घाटकोपरमधील पंतनगर मनपा मराठी शाळा क्र. २ ची सार्वजनिक जागा खासगी संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाविरोधात भाजपच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आमदार पराग शाह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात नागरिकांनी सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी तीव्र भूमिका मांडली.

May 30, 2026 - 20:53
May 30, 2026 - 20:53
 0  22
पंतनगर मनपा शाळा क्र. २ ची जागा वाचवण्यासाठी घाटकोपरकरांचा जनआक्रोश; जागा हस्तांतरण प्रस्तावाविरोधात भाजपचे आंदोलन
पंतनगर शाळा, घाटकोपर आंदोलन, पराग शाह, राखी जाधव,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

घाटकोपर, मुंबई : पंतनगर मनपा मराठी शाळा क्र. २ ची सार्वजनिक जागा खासगी संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाविरोधात घाटकोपरमध्ये भाजपच्या वतीने भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आमदार पराग शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वॉर्ड क्रमांक १३१ च्या नगरसेविका राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान उपस्थितांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, प्रशासकीय कार्यकाळात कोणतीही पारदर्शक निविदा प्रक्रिया न राबवता पंतनगर मनपा शाळा क्र. २ ची जागा निर्मल एज्युकेशन सोसायटी (ज. मो. अभ्यंकर) यांना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केवळ ११ वर्गखोल्यांमध्ये शिक्षण देणाऱ्या संस्थेला संपूर्ण शाळेची जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

यावेळी वक्त्यांनी सार्वजनिक मालमत्ता आणि जनतेच्या हक्काच्या जागांवर कोणत्याही प्रकारचा अतिक्रमण अथवा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. घाटकोपरकरांच्या हक्कासाठी हा संघर्ष रस्त्यावर तसेच सभागृहातही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विकास कामत, रवीभाई पूज, महिला पदाधिकारी अनिता अतितकर, मंडळ अध्यक्ष रचित त्रिवेदी, महामंत्री संजय दरेकर, वॉर्ड अध्यक्ष सचिन भोसले, मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा अनु खत्री, वॉर्ड महिला मोर्चा अध्यक्षा गीता जाधव तसेच घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

"घाटकोपरची जागा घाटकोपरकरांसाठीच", "जनतेच्या हक्कावर घाला घालणाऱ्यांना थारा नाही" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0