ताथवडेतील ११ लाख झाडांवर कुऱ्हाड नको; पोलीस आयुक्तालयासाठी पर्यायी जागेचा विचार करा – खासदार श्रीरंग बारणे

ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर पोलीस आयुक्तालय उभारण्याऐवजी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ११ लाख झाडांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी यशदाला दिलेल्या जागेतील ५० एकर जागा आयुक्तालयासाठी वापरण्याचा पर्याय त्यांनी सुचविला.

Jul 5, 2026 - 22:06
 0  3
ताथवडेतील ११ लाख झाडांवर कुऱ्हाड नको; पोलीस आयुक्तालयासाठी पर्यायी जागेचा विचार करा – खासदार श्रीरंग बारणे
श्रीरंग बारणे, ताथवडे, ११ लाख झाडे, पोलीस आयुक्तालय, देवेंद्र फडणवीस,

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील वळुमाता प्रक्षेत्रातील सुमारे ११ लाख झाडांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयासाठी पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विद्यमान निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.

खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सुमारे ५० एकर जागेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा असून हुंदाई कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत वनराई संस्थेमार्फत सुमारे ११ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय परिसरात अनेक नैसर्गिक व जुने वृक्षही अस्तित्वात आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून बांधकाम करणे पर्यावरणाच्या दृष्टीने अयोग्य ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

शहरातील वाढते प्रदूषण आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता या वृक्षसंपदेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पोलीस आयुक्तालयासाठी पर्यायी जागा उपलब्ध असून कार्यक्षेत्रातील गायरान जमिनींचा विचार करता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'यशदा'ला दिलेल्या जागेचा पर्याय

खासदार बारणे यांनी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) यांना ताथवडे येथे यापूर्वी देण्यात आलेल्या ७५ एकर जागेपैकी ५० एकर जागा पोलीस आयुक्तालयासाठी उपलब्ध करून देण्याचा पर्याय सुचविला आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांत या जागेचा अपेक्षित वापर झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्या जागेचा वापर पोलीस आयुक्तालयासाठी केल्यास विद्यमान वृक्षसंपदा अबाधित राहील आणि पर्यावरणाचे संरक्षणही होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

सेंटर पार्क विकसित करण्याची मागणी

पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची सुमारे ६७ हेक्टर जागा कायम विभागाकडेच ठेवून तिचे व्यवस्थापन आणि देखभाल पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपवावी, अशीही मागणी खासदार बारणे यांनी केली आहे. या ठिकाणी शहरासाठी भव्य 'सेंटर पार्क' विकसित केल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हरित खुली जागा उपलब्ध होईल, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा जतन करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

या संपूर्ण प्रस्तावाचा फेरविचार करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, परिसरातील वृक्षांची वस्तुनिष्ठ मोजणी करावी तसेच पर्यावरण तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांचे मत विचारात घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कोट

"पोलीस आयुक्तालयाला जागा देण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, ताथवडे येथील जागेवर ११ लाख झाडांची लागवड करण्यात आली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या वृक्षसंपदेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे यशदाला देण्यात आलेल्या जागेपैकी ५० एकर जागा पोलीस आयुक्तालयासाठी देण्याचा विचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे."

– श्रीरंग बारणे, खासदार

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.