कोल्हापुरात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानासाठी नियोजन बैठक; १ ते ३१ जुलैदरम्यान मोफत आरोग्य तपासणी

कोल्हापुरात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. १ ते ३१ जुलैदरम्यान मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Jul 4, 2026 - 00:34
 0  3
कोल्हापुरात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानासाठी नियोजन बैठक; १ ते ३१ जुलैदरम्यान मोफत आरोग्य तपासणी
मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर, कोल्हापूर, डॉ विजय राठोड,

कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव 

मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई यांच्या समन्वयाने राज्यभर १ ते ३१ जुलै या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात नियोजन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड होते.

या अभियानांतर्गत नागरिकांना मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी, विविध केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती, रक्तदान शिबिरे, ABHA (आभा) कार्ड नोंदणी तसेच आवश्यक आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत कार्यरत रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये, एचएलएल यंत्रणा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन तसेच विविध सेवाभावी संस्थांचा समन्वय राहणार आहे.

बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यार्थी, परावैद्यकीय कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांशी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, आरोग्य सुविधा आणि नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून अभियान प्रभावीपणे राबवावे, जेणेकरून जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना आरोग्य तपासणी आणि शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश दिले.

जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेत मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.