मान्सूनपूर्व वीज कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व वीज देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला. संवेदनशील भागांमध्ये तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यासह वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानिवतरणला विविध निर्देश देण्यात आले.
गडचिरोली प्रतिनिधी:
गडचिरोली, दि. २४ (जिमाका) : गडचिरोली हा दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्हा असल्याने पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तक्रारींची वाट न पाहता महानिवतरणने सक्रियपणे काम करावे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज वितरण आणि पारेषण व्यवस्थेच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानिवतरणचे अधीक्षक अभियंता ए. ए. लोमसे, प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता हितेश पारेख, जे. एच. वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे ६० टक्क्यांपेक्षा कमी पूर्ण झालेल्या विभागांतील जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सिरोंचा तालुक्याचा संपूर्ण वीजपुरवठा सध्या अल्लापल्ली ते सिरोंचा या सुमारे ९५ किलोमीटर लांबीच्या ६६ केव्ही वीजवाहिनीवर अवलंबून आहे. या वाहिनीचा मोठा भाग घनदाट जंगलातून जात असल्याने वादळी वाऱ्यांमुळे झाडे कोसळून वारंवार व्यत्यय निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर जिमलगट्टा तसेच इतर संवेदनशील ठिकाणी चेन-सॉ कटर, वाहने आणि आवश्यक उपकरणांसह विशेष पथके कायमस्वरूपी तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच संवेदनशील भागांचे मॅपिंग करून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला. सिरोंचाच्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून तेलंगणातील किस्टामपेठ येथून सिरोंचापर्यंत १३२ केव्ही वीजवाहिनी उभारण्याचे काम सुरू असून ते डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत अंकिनसा, बामणी, कारसपल्ली, घोट, येनापूर, आरमोरी आणि आमीझा या वारंवार व्यत्ययग्रस्त फीडर्सचा विशेष आढावा घेण्यात आला. अशा फीडर्सचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालकत्व स्वीकारून व्यत्यय कमी करण्यासाठी विशेष कृती आराखडा राबवावा, असे निर्देश देण्यात आले.
भामरागड परिसरातील घनदाट जंगलातून जाणाऱ्या वीजवाहिन्यांवरील जुन्या इन्सुलेटर्सच्या जागी पॉलिमर इन्सुलेटर्स बसविण्याचे कामही गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी महानिवतरणने विविध उपकेंद्रांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. सिरोंचा स्विचयार्ड, जिमलगट्टा, अल्लापल्ली, चामोशी, गडचिरोली आणि एटापल्ली येथील नियंत्रण कक्षांशी नागरिक संपर्क साधू शकतात.
बैठकीस महानिवतरणचे अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते तसेच संबंधित तांत्रिक अधिकारी उपस्थि
त होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0