आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश; नाशिकच्या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी १९२ पदनिर्मितीस मंजुरी
आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नाशिकमधील १०५ खाटांच्या संदर्भ सेवा रुग्णालयासाठी ९५ आणि १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी ९७ अशा एकूण १९२ पदनिर्मितीस महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नाशिकमध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक ब्यूरो:
नाशिक, दि. २५ जून : आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून नाशिक शहरातील दोन महत्त्वाच्या आरोग्य प्रकल्पांसाठी आवश्यक पदनिर्मितीस महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालय आणि १०० खाटांचे स्त्री रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये पेडियाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी तसेच अर्भक अतिदक्षता विभाग (NICU) सुरू करण्यासाठी १०५ खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाला सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तसेच नाशिक शहरात उभारण्यात येत असलेले १०० खाटांचे स्त्री रुग्णालयही पूर्णत्वाच्या मार्गावर असून ते लवकर सुरू व्हावे यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. दिनांक १६ जून २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी दोन्ही रुग्णालयांसाठी निधी आणि पदनिर्मितीची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ जून २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नव्या आणि श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मितीस मंजुरी दिली.
या निर्णयानुसार नाशिकच्या १०५ खाटांच्या संदर्भ सेवा रुग्णालयासाठी कर्करोग विभाग, न्युरोसर्जरी विभाग, हृदयरोग विभाग, प्लास्टिक सर्जरी, क्ष-किरण विभाग, शरीरविकृती विभाग, शुश्रूषा विभाग तसेच विविध अवैद्यकीय विभागांसाठी एकूण ९५ नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
तर १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच प्रशासकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या ९७ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
या पदनिर्मितीमुळे नाशिक जिल्ह्यातील महिला, बालके आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना मुंबई किंवा पुण्यासारख्या महानगरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कर्करोग, न्युरोसर्जरी, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी आणि अर्भक अतिदक्षता सेवांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असल्याने हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाने पदनिर्मितीस मंजुरी दिल्याबद्दल आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू व्हावीत यासाठी पुढेही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0