वैष्णव-शैव आखाड्यांच्या साक्षीने श्री नृसिंह कृपादासजी महाराज महंतपदी विराजमान; त्र्यंबकेश्वरात भव्य पट्टाभिषेक सोहळा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे वैष्णव व शैव आखाड्यांच्या प्रमुख संत-महंतांच्या उपस्थितीत श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा वैदिक मंत्रोच्चारात महंतपदाचा पट्टाभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.

Jun 28, 2026 - 01:37
 0  22
वैष्णव-शैव आखाड्यांच्या साक्षीने श्री नृसिंह कृपादासजी महाराज महंतपदी विराजमान; त्र्यंबकेश्वरात भव्य पट्टाभिषेक सोहळा
श्री नृसिंह कृपादासजी महाराज, महंत पट्टाभिषेक, त्र्यंबकेश्वर, सिंहस्थ

नाशिक ब्यूरो:

नाशिक, दि. २७ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधत त्र्यंबकेश्वर येथे समस्त विरक्त साधू मंडळ, नाशिक, बागलाण मंडळ तसेच विविध वैष्णव व शैव आखाड्यांच्या प्रमुख संत, महंत आणि साधूंच्या साक्षीने श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा महंतपदाचा भव्य पट्टाभिषेक सोहळा वैदिक मंत्रघोषात संपन्न झाला. या सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते.

मुख्य सोहळ्यापूर्वी मानाच्या आखाड्यांचे निशाण व ध्वजांसह गोदाघाटावरून श्री नृसिंह कृपादासजी महाराजांची शंखनाद, वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये अखाडा परिषदेचे प्रतिनिधी, वृंदावन येथील इस्कॉनचे प्रतिनिधी, वेदपाठशाळेचे विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले.

गोदा पूजन, श्री हनुमान व श्री एकमुखी दत्त मंदिर दर्शनानंतर रामतीर्थ मठातील वैदिक गुरुकुलात मुख्य धार्मिक विधींना प्रारंभ झाला. गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध आणि प्रधान देवता पूजन आदी विधी पार पडल्यानंतर वैदिक गुरुकुलाचे प्रमुख पंडित शांताराम शास्त्री भानोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पट्टाभिषेक विधी पार पडला.

यावेळी विविध आखाड्यांच्या महंतांनी महंतपदाचे महत्त्व, अखाडा परंपरा तसेच श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. वारकरी संप्रदायाचे महामंडलेश्वर ह.भ.प. रामकृष्णदास लहवितकर महाराज, श्री रामचंद्र गोस्वामी, श्री गजानन प्रभू, श्री गोविंद प्रभूजी, श्री देवेंद्र पंढरी आदींनी आशीर्वचन दिले.

महंत तथा सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य प्रवक्ते महंत भक्ती चरणदास महाराज यांनी नाशिकला लाभलेल्या या मानाचे आणि आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने या महंतपदाचे महत्त्व अधोरेखित केले. शैव आणि वैष्णव आखाड्यांची एकत्रित उपस्थिती हा या सोहळ्याचा विशेष आकर्षणबिंदू ठरला.

अखाडा परिषदेच्या परंपरेनुसार प्रमुख प्रतिनिधींनी वैदिक मंत्रोच्चारात महंतपदाचा विधी पूर्ण करून अधिकृत घोषणा केली. यासंदर्भातील कायदेशीर खलिताही तयार करण्यात आला.

कार्यक्रमास मुख्यमंत्री कार्यालयाचे नियुक्त कुंभमेळा समन्वयक रामेश्वर नाईक, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्निल नन्नावरे, स्वागताध्यक्ष धनंजय बेळे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच सायंकाळी ५१ गोदासेवकांच्या हस्ते भव्य गोदाआरती आयोजित करण्यात आली. पट्टाभिषेकानंतर भाविकांनी श्री नृसिंह कृपादासजी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1