चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात मेगा मका प्रक्रिया उद्योगाला गती; जमीन, वीज आणि पाणी उपलब्धतेसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश – मंत्री छगन भुजबळ

येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात सुखजीत स्टार्च कंपनीचा मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहे. १२५ एकर जमीन, ६ मेगावॅट वीज आणि दररोज ५० लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

Sep 7, 2026 - 23:59
Sep 8, 2026 - 00:00
 0  7
चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात मेगा मका प्रक्रिया उद्योगाला गती; जमीन, वीज आणि पाणी उपलब्धतेसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश – मंत्री छगन भुजबळ
चिचोंडी औद्योगिक क्षेत्र, येवला मका प्रक्रिया उद्योग, सुखजीत स्टार्च कंपनी, छगन भुजबळ, मका उत्पादक शेतकरी,

नाशिक ब्यूरो:

मुंबई, दि. ७ : नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर मोठी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार असून, प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, वीज आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, जमीन उपलब्धता, पाणीपुरवठा, वीजपुरवठा तसेच विविध विभागांमार्फत करावयाच्या प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

१२५ एकर जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही

चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात या प्रकल्पासाठी सुमारे १२५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक पाणी आणि वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाकडून आवश्यक सहकार्य करण्यास संमती देण्यात आली आहे.

प्रकल्पाची उभारणी आणि कार्यान्वयन वेळेत होण्यासाठी उद्योग विभाग, जलसंपदा विभाग, एमआयडीसी, महावितरण आणि अन्य संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

सुखजीत स्टार्च लिमिटेडचा उद्योग लवकर सुरू व्हावा यासाठी उद्योग विभाग आणि संबंधित कंपनीने सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही मंत्री भुजबळ यांनी दिले.

दररोज २,४०० टन मक्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज १,२०० टन मक्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता वाढवून दररोज २,४०० टन मक्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ३ लाख ५० हजार मेट्रिक टन मक्यावर प्रक्रिया होणार आहे. नाशिक जिल्ह्यात मका हे प्रमुख पीक असून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील मका उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच मक्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणारा हा उद्योग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सुमारे ५० हजार मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा

प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल ३ लाख ५० हजार मेट्रिक टन मक्याची मागणी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याचा येवला आणि परिसरातील सुमारे ५० हजार मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. स्थानिक पातळीवरच मोठी औद्योगिक मागणी निर्माण झाल्यामुळे मका उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यामुळे मका पिकाच्या मूल्यवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. कृषी उत्पादनाला थेट प्रक्रिया उद्योगाशी जोडल्यामुळे येवला परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

१,००० हून अधिक थेट रोजगाराच्या संधी

या मेगा प्रकल्पामुळे ग्रामीण भागात १,००० हून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यासोबतच वाहतूक, साठवणूक, कृषी सेवा, देखभाल, लॉजिस्टिक्स आणि इतर पूरक व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येवला तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा मजबूत होऊन ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे.

स्वतंत्र फिडरद्वारे ६ मेगावॅट वीजपुरवठा

प्रकल्पासाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र फिडरद्वारे ६ मेगावॅट वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

तसेच प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून दररोज ५० लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

वापरलेल्या पाण्यापैकी ६० टक्के पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार

या प्रकल्पासाठी पुरविण्यात येणाऱ्या एकूण पाण्यापैकी ६० टक्के पाणी पुनर्प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

त्यामुळे औद्योगिक प्रकल्पासोबतच पाण्याचा पुनर्वापर आणि शेतीसाठी त्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रकल्पाचा ‘मेगा प्रोजेक्ट’मध्ये समावेश

मका पिकावर आधारित या मोठ्या मूल्यवर्धन उद्योगाला आवश्यक अतिरिक्त सवलती आणि प्रोत्साहनांचा लाभ मिळावा यासाठी या प्रकल्पाचा ‘मेगा प्रोजेक्ट’मध्ये समावेश करण्यात येणार आहे.

यामुळे प्रकल्पाला विविध शासकीय सवलती, सुविधा आणि प्रोत्साहनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असून, प्रकल्पाची उभारणी जलदगतीने पूर्ण करण्यास हातभार लागणार आहे.

‘शेतमालापासून उद्योग आणि उद्योगातून रोजगार’ विकासाची साखळी

“शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक पातळीवरच मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मका पिकाचे मूल्यवर्धन करणे आणि येवला तालुक्यात उद्योग व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा,” असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

या प्रकल्पामुळे ‘शेतमालापासून उद्योग आणि उद्योगातून रोजगार’ अशी विकासाची साखळी निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येवला तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच चिचोंडी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित

या बैठकीला आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, जलसंपदा विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उद्योग विभागाचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब यशवंते, उद्योग उपसचिव आबासाहेब कवळे, नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कल्पेश लहिवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार आणि नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माजी खासदार समीर भुजबळ, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र कुशवाह, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आदी सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.