मतदार यादी विशेष पुनरीक्षणासाठी कावनईतील कातकरी वस्तीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद; पात्र मतदारांना बीएलओंना सहकार्याचे आवाहन
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कातकरी वस्तीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीत अचूक नोंद व्हावी यासाठी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नाशिक | ब्यूरो : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कातकरी वस्तीला भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासोबत घराघरांत जाऊन नागरिकांची भेट घेतली आणि प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून दुर्गम आणि वंचित समाजघटकांतील एकही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद होणे अत्यंत आवश्यक असून विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांनी आपले गणना प्रपत्र वेळेत भरून संबंधित बीएलओंकडे जमा करावे. हा कालबद्ध कार्यक्रम असल्याने सर्वांनी वेळेत सहकार्य करून मतदार यादी अद्ययावत करण्यास हातभार लावावा, असेही त्यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कातकरी वस्तीतील ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.
यावेळी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, मंडळ अधिकारी प्रशांत गोसावी, ग्राम महसूल अधिकारी जयंत धोडपकर तसेच बीएलओ संतोष शिरसाट आणि स्वाती शिरसाट उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0