राज्यात गेल्या २४ तासांत पालघरमध्ये सर्वाधिक २०३.३ मिमी पाऊस; ८ जुलैपासून बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, रायगड, मुंबई उपनगर आणि पुणे जिल्ह्यांतही दमदार पाऊस झाला. मात्र, ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई | दि. ७ जुलै २०२६
राज्यात गेल्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांत दमदार पावसाची नोंद झाली असून पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ठाणे, रायगड, मुंबई उपनगर आणि पुणे जिल्ह्यांतही चांगला पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांतील प्रमुख पर्जन्यमानानुसार ठाणे जिल्ह्यात ११६.४ मिमी, रायगडमध्ये १०८.७ मिमी, मुंबई उपनगरात ९०.४ मिमी आणि पुणे जिल्ह्यात ७०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय रत्नागिरीमध्ये ५८.४ मिमी, कोल्हापूरमध्ये ४७.७ मिमी, साताऱ्यात ४६.६ मिमी, सिंधुदुर्गमध्ये ३७.१ मिमी आणि नाशिकमध्ये ३६ मिमी पाऊस झाला.
तर धुळे (९.६ मिमी), नंदुरबार (६.४ मिमी), जळगाव (८.८ मिमी), अहिल्यानगर (२६.८ मिमी), सोलापूर (३.६ मिमी), सांगली (१३.४ मिमी), छत्रपती संभाजीनगर (१४.१ मिमी), जालना (५.६ मिमी), बीड (६.२ मिमी), लातूर (०.७ मिमी), धाराशिव (६.८ मिमी), नांदेड (०.५ मिमी), परभणी (१ मिमी), हिंगोली (१.९ मिमी), बुलढाणा (४.८ मिमी), अकोला (४.६ मिमी), वाशिम (१.३ मिमी), अमरावती (२.३ मिमी), यवतमाळ (०.८ मिमी), वर्धा (०.८ मिमी), नागपूर (१.१ मिमी), भंडारा (१.४ मिमी), गोंदिया (१.५ मिमी), चंद्रपूर (०.६ मिमी) आणि गडचिरोली जिल्ह्यात २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
८ जुलैपासून पावसात घट होण्याचा अंदाज
जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेशातील धुळे व नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून ही परिस्थिती पुढील दहा दिवस कायम राहू शकते. या कालावधीत कमाल तापमानात वाढ होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील हवामानातील बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून कृषीविषयक निर्णय घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, पुढील काही दिवस हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0