"दुसऱ्याची पोरं मांडीवर घेऊन पाळणा हलवणाऱ्यांनी फोडाफोडीवर भाष्य करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!" – ॲड. अमोल मातेले यांचा भाजपवर घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्या राज ठाकरे यांच्यावरील वक्तव्याचा समाचार घेत भाजपवर पक्षफोडीच्या राजकारणाचे गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील जनतेला सर्व काही माहीत असून योग्य वेळी राजकीय हिशेब होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई | प्रतिनिधी : मनिषा गुरव (चीफ एडिटर)
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी भाजपवर पक्षफोडीच्या राजकारणाचा आरोप करत, "दुसऱ्याची पोरं मांडीवर घेऊन पाळणा हलवणाऱ्यांनी फोडाफोडीवर भाष्य करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा," असा घणाघाती टोला लगावला.
ॲड. मातेले म्हणाले की, ज्यांच्या पक्षावर सातत्याने विरोधी पक्षांतील आमदार, खासदार आणि नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन राजकीय समीकरणे बदलल्याचे आरोप झाले आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांनी इतरांना फोडाफोडीचे धडे देणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे.
ते पुढे म्हणाले की, "राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाप्रमाणे कधी दुसऱ्या पक्षांतील आमदार, खासदार किंवा कार्यकर्त्यांना फोडून स्वतःचे राजकारण उभे केले का? हा प्रश्न भाजपने आधी स्वतःला विचारावा. दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा राजकीय इतिहास तपासण्याची गरज आहे."
गेल्या काही वर्षांत देशातील विविध राज्यांमध्ये विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात सामावून घेत सरकारे स्थापन झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पक्षफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक आरोप जर कोणत्या पक्षावर झाला असेल, तर तो भाजपवरच झाल्याचे जनतेला माहीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकशाही व्यवस्थेत मतदारांनी एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेच्या समीकरणासाठी आपल्या बाजूला वळवून सरकारे स्थापन करणे आणि त्यालाच नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न करणे, ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला मान्य नसल्याचे ॲड. मातेले यांनी स्पष्ट केले.
"भाजपला बहुतेक दुसऱ्याची पोरं मांडीवर घेऊन पाळणा हलवण्यातच अधिक आनंद मिळतो. त्यामुळे स्वतःच्या कार्यकर्त्यांपेक्षा आयात केलेल्या नेत्यांवर त्यांचा अधिक विश्वास असल्याचे वारंवार दिसून येते," अशी टीकाही त्यांनी केली.
शेवटी त्यांनी भाजपला इशारा देत म्हटले की, "दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःचा राजकीय आरसा एकदा पाहावा. महाराष्ट्रातील सुजाण जनता सर्व काही पाहत आहे आणि योग्य वेळी त्याचा राजकीय हिशेबही करेल."
या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0