पूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेवर आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप
मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या परीक्षेत पूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आमदार सत्यजीत तांबे यांनी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
नाशिक ब्यूरो
मुंबई | ३ जुलै २०२६
मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालात पूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर हेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील गंभीर हलगर्जीपणा उघड झाला आहे. या प्रकरणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विद्यापीठ प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आमदार तांबे म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासा, त्यांच्या भविष्याची परीक्षा घेऊ नका. शून्य गुण द्यायचेच असतील, तर अशा निष्काळजी आणि ढिसाळ व्यवस्थेलाच द्या." विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित अशा गंभीर त्रुटी अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुनर्तपासणीनंतर संबंधित विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असला, तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक वेळ, आर्थिक क्षमता आणि मानसिक तयारी असतेच असे नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चुकीच्या निकालामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान भरून काढण्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांत राज्यात पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, निकालातील त्रुटी आणि आता उत्तरपत्रिका तपासणीतील हलगर्जीपणा अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि परीक्षकांवर कठोर कारवाई करावी, तसेच उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेचे स्वतंत्र व पारदर्शक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली.
यासोबतच परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून भविष्यात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा निष्काळजीपणाचा खेळ होणार नाही, यासाठी अधिक सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार परीक्षा प्रणाली उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0