उपनगरीय रुग्णालयांमध्ये HMIS प्रणालीची अंमलबजावणी गतीने पूर्ण करा; अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे निर्देश

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी भाभा रुग्णालयाला आकस्मिक भेट देत उपनगरीय रुग्णालयांमध्ये HMIS प्रणालीची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यावर भर दिला.

Jul 2, 2026 - 18:54
 0  3
उपनगरीय रुग्णालयांमध्ये HMIS प्रणालीची अंमलबजावणी गतीने पूर्ण करा; अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे निर्देश
BMC, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्राजक्ता वर्मा लवंगारे,

मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी वांद्रे (पश्चिम) येथील खुरशादजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाला आकस्मिक भेट देत उपनगरीय रुग्णालयांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीची अंमलबजावणी अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच दैनंदिन कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला.

१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या या आकस्मिक पाहणीदरम्यान त्यांनी पुरुष व महिला वॉर्ड, नवजात शिशू विभाग, प्रसाधनगृहे तसेच विविध वैद्यकीय विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी HMIS संगणकीय प्रणाली, औषधसाठा, रुग्णांवरील उपचार, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि रुग्णालयाच्या एकूण कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

भाभा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयाच्या कार्यक्षमतेबरोबरच सुरू असलेल्या पुनर्विकास कामांची माहिती अतिरिक्त आयुक्तांना दिली.

बैठकीदरम्यान श्रीमती वर्मा-लवंगारे यांनी नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी HMIS प्रणालीची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. रुग्ण नोंदणी, दैनंदिन हजेरी, औषध उपलब्धता, आरोग्य सेवा व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाज यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा अधिक गतिमान करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविल्यास दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होण्यासोबतच कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणेही शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महानगरपालिका रुग्णालयांनी तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अवलंब करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी खुरशादजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, सिद्धार्थ महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय तसेच पंडित मदनमोहन मालवीय महानगरपालिका शताब्दी रुग्णालय (गोवंडी) येथे सुरू असलेल्या आरोग्य सेवा आणि पुनर्विकास कामांचाही आढावा घेण्यात आला.

रुग्णालय पायाभूत सुविधा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुनर्विकास प्रकल्पांपुढील अडचणी, विविध टप्प्यांतील कामांची प्रगती, मनुष्यबळाची उपलब्धता आणि नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व पुनर्विकास प्रकल्प नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांना अधिक दर्जेदार, जलद आणि पारदर्शक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने वेगाने पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0