मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत ‘Vaidya AI’चा वापर; रुग्ण संवाद आणि उपचार प्रक्रिया अधिक स्मार्ट होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेने फ्रॅक्टल एनॅलिटिक्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार करून ‘Vaidya AI’ ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्ण संवाद, उपचार प्रक्रिया आणि प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे.

Jul 4, 2026 - 00:38
 0  7
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत ‘Vaidya AI’चा वापर; रुग्ण संवाद आणि उपचार प्रक्रिया अधिक स्मार्ट होणार
मुंबई महानगरपालिका, Vaidya AI, Fractal Analytics,

मुंबई | प्रतिनिधी संदीप गिरकर 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महानगरपालिकेने फ्रॅक्टल एनॅलिटिक्स लिमिटेड या संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करून ‘Vaidya AI’ ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार शुक्रवारी (३ जुलै) करण्यात आला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, उपायुक्त प्रशांत गायकवाड, शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते तसेच फ्रॅक्टल एनॅलिटिक्सचे श्रीकांथ वेलमकन्नी, सूरज अमोणकर आणि शुभेंदू कानडे उपस्थित होते.

रुग्ण संवाद आणि उपचार प्रक्रिया अधिक सुलभ

‘Vaidya AI’च्या माध्यमातून नागरिकांशी बहुभाषिक संवाद, प्राथमिक आरोग्य सल्ला, उपचारापूर्वी आवश्यक माहिती संकलन तसेच रुग्णालय प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. यामुळे डॉक्टरांना बाह्यरुग्ण विभागात (OPD) रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करून योग्य उपचार देणे सुलभ होईल.

रुग्णांच्या रक्त तपासणीसारख्या वैद्यकीय अहवालातील माहितीही सामान्य नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्याची सुविधा या प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध होणार आहे.

HMIS आणि व्हॉट्सअॅप चॅटबॉटशी जोडणी

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत Hospital Management Information System (HMIS) ही प्रणाली ‘Vaidya AI’शी संलग्न करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेचा व्हॉट्सअॅप चॅटबॉट, रुग्णालयांचे पोर्टल आणि विविध प्रशासकीय प्रणालीदेखील या AI प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहेत.

यामुळे नागरिकांना विविध भाषांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळेल, तर प्रशासकीय कामकाजावरील ताण कमी होऊन डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे दैनंदिन काम अधिक कार्यक्षम होईल.

प्रायोगिक टप्प्यात चार आरोग्य संस्था

प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि निवडक महानगरपालिका दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

या कालावधीत कर्मचाऱ्यांना प्रणालीचे प्रशिक्षण, नागरिकांचा प्रतिसाद, डेटा सुरक्षा आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, मुंबईसारख्या महानगरातील वाढत्या आरोग्यविषयक गरजांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाचा अधिक परिणामकारक वापर होऊन नागरिकांना जलद आणि दर्जेदार सेवा देणे शक्य होईल.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनीही या प्रणालीमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे दैनंदिन काम अधिक सुलभ होऊन आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘Vaidya AI’ हे व्यासपीठ India AI Mission अंतर्गत विकसित करण्यात आले असून, विविध राज्ये आणि शासकीय संस्थांमध्ये आरोग्य व प्रशासन क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना विकसित करण्याचा अनुभव फ्रॅक्टल एनॅलिटिक्सला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0