भर पावसात महापौर रितू तावडे यांची घाटकोपर पूर्वमध्ये पाहणी; पाणी निचरा, मॅनहोल सुरक्षा आणि पायाभूत सुविधांबाबत तातडीचे निर्देश

मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर पूर्व परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत पाणी निचरा, मॅनहोल सुरक्षा, गटारे, पर्जन्य जलवाहिन्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजनांचे निर्देश दिले.

Jul 4, 2026 - 00:12
 0  13
भर पावसात महापौर रितू तावडे यांची घाटकोपर पूर्वमध्ये पाहणी; पाणी निचरा, मॅनहोल सुरक्षा आणि पायाभूत सुविधांबाबत तातडीचे निर्देश
रितू तावडे, घाटकोपर पूर्व, मुंबई पाऊस, महापौर

मुंबई प्रतिनिधी देवानंद शिंदे 

मुंबई | ३ जुलै २०२६

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी शुक्रवारी (३ जुलै) घाटकोपर पूर्वमधील प्रभाग क्रमांक १३२ मधील विविध भागांचा भर पावसात प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना पावसामुळे कोणताही त्रास होऊ नये तसेच तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात स्थानिक आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी तसेच महानगरपालिकेच्या एन विभागातील अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.

महापौरांनी सखल व अतिसखल भागांतील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. पुनर्विकास सुरू असलेल्या सर्व इमारतींच्या बाहेर नवीन गटारे बांधणे, मॅनहोलवर मजबूत झाकणे बसविणे आणि संकल्प सेवा परिसरातील रुपारेल इमारतीबाहेरील गटाराचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सत्कार आणि सुखदा इमारतीबाहेर साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नवीन नलिका उभारण्याचे तसेच विद्याभवन रस्ता आणि भजन समाज मार्ग (गारोडिया पॅलेससमोर) येथील पदपथावरील ढापा झाकणे बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

डॉ. हेडगेवार उद्यानाजवळ नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकून रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी थेट जलवाहिनीत वळविण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. तसेच पुष्प विहार मार्गावरील नलिकांवर संरक्षक जाळ्या आणि झाकणे बसविण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रगती चाळीच्या प्रवेशद्वारावरील मॅनहोल सुरक्षित करण्याबरोबरच चाळीमागील नाल्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे उभारण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच नागरिकांना नाला ओलांडून शौचालयात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि रेलिंगची व्यवस्था करण्याचेही निर्देश देण्यात आले.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाथ पै रस्त्यावर 'नो पार्किंग'ची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मेट्रो उड्डाणपुलाखाली पादचाऱ्यांसाठी सुरक्षित क्रॉसिंगची व्यवस्था करण्याबाबत वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या.

गारोडिया नगर फेडरेशनच्या जागेवर कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून उद्यान विकसित करण्याचे नियोजन करण्यास उद्यान विभागाला सांगण्यात आले. याशिवाय रस्त्यांच्या कामांमुळे झाडांची मुळे बाधित होऊ नयेत, याची काळजी घेण्याचे तसेच भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण आणि निर्बीजीकरण मोहीम वेगाने राबविण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले.

यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या, "पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षा आणि मूलभूत सुविधा हे महानगरपालिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. घाटकोपर पूर्वमधील सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा जलद व्हावा आणि सर्व पायाभूत कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे."

भर पावसात महापौर, आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी आणि महानगरपालिका अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करत असल्याने स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. दिलेल्या सूचनांनुसार सर्व कामे तातडीने पूर्ण होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1