सोमनाथ स्वाभिमान पर्व' उपक्रमाला मुंबईतून प्रारंभ; सोमनाथ मंदिर राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक – मंत्री ॲड. आशिष शेलार

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे' या विशेष सांस्कृतिक उपक्रमाला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून प्रारंभ झाला. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमनाथ मंदिर हे राष्ट्रीय स्वाभिमान, सांस्कृतिक अस्मिता आणि भारतीय सभ्यतेचे प्रतीक असल्याचे सांगत उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

Jul 6, 2026 - 15:46
Jul 6, 2026 - 15:54
 0  7
सोमनाथ स्वाभिमान पर्व' उपक्रमाला मुंबईतून प्रारंभ; सोमनाथ मंदिर राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक – मंत्री ॲड. आशिष शेलार
सोमनाथ स्वाभिमान पर्व, आशिष शेलार, सोमनाथ मंदिर, महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग,

मुंबई प्रतिनिधी संदीप गिरकर 

मुंबई | ५ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे' या विशेष सांस्कृतिक उपक्रमाला आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून रेल्वेमार्गे उत्साहात प्रारंभ झाला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सोमनाथ मंदिराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, "सोमनाथ मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून राष्ट्रीय स्वाभिमान, सांस्कृतिक अस्मिता आणि भारतीय सभ्यतेच्या अखंड परंपरेचे प्रतीक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सोमनाथ मंदिराचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि त्यामागील प्रेरणादायी परंपरा समाजाच्या अधिक व्यापक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे."

या विशेष यात्रेदरम्यान सहभागी नागरिकांना सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडविण्यात येणार असून मंदिराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरेतील त्याचे स्थान तसेच अध्यात्मिक महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद सत्रे आणि भारतीय संस्कृती व मूल्यांवर आधारित विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास विधानसभा सदस्य संजय उपाध्ये, नगरसेवक शिवा शेट्टी, आयआरसीटीसीचे अतिरिक्त कार्यकारी प्रबंधक हर्षवर्धनसिंग रावत तसेच रेल्वेचे अतिरिक्त वाणिज्य व्यवस्थापक अमित करवंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली. अभिजात कला, लोककला आणि भारतीय परंपरेचा अमूल्य वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

'सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे' या उपक्रमामुळे सोमनाथच्या वैभवशाली इतिहासाचा, अध्यात्मिक परंपरेचा आणि भारतीय सांस्कृतिक वारशाचा परिचय अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचेल, तसेच राष्ट्रीय अस्मिता आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ करण्यास या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असा विश्वासही श्रीराम पांडे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भारतीय सांस्कृतिक वारशाबद्दल जनजागृती करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2