कॉटनग्रीन-रे रोड परिसरात महापौर रितू तावडे यांची भर पावसात पाहणी; पाणी निचरा व मॅनहोल सुरक्षिततेबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टला तातडीचे निर्देश

मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी कॉटनग्रीन, रे रोड आणि शिवडी परिसराची पाहणी केली. पाणी साचल्याने मुंबई पोर्ट ट्रस्टला तातडीने पंप बसविण्याचे तसेच मॅनहोल सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Jul 4, 2026 - 00:20
 0  9
कॉटनग्रीन-रे रोड परिसरात महापौर रितू तावडे यांची भर पावसात पाहणी; पाणी निचरा व मॅनहोल सुरक्षिततेबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टला तातडीचे निर्देश
रितू तावडे, कॉटनग्रीन, रे रोड, शिवडी, मुंबई पोर्ट ट्रस्ट,

मुंबई प्रतिनिधी नरेश शिंदे 

मुंबई | ३ जुलै २०२६

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी शुक्रवारी कॉटनग्रीन रेल्वे स्थानक, रे रोड आणि शिवडी अग्निशमन केंद्र परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

पाहणीदरम्यान मुंबई पोर्ट ट्रस्ट (मुंबई पत्तन प्राधिकरण - MbPT) च्या हद्दीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्याचा निचरा होत नसल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी उपसा करणारे उच्च क्षमतेचे पंप कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. परिसरात पाणी साचले असतानाही पाणी उपशासाठी कोणतेही पंप तैनात नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाजवळील पुलाखाली भर पावसात मॅनहोल उघडे ठेवून काम सुरू असल्याचेही पाहणीत आढळले. या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स नव्हते तसेच संबंधित अभियंता किंवा अधिकारीही उपस्थित नव्हते. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी थांबून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले.

याशिवाय, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी करून ते सुरक्षित स्थितीत असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, पावसाळी उपाययोजना, सार्वजनिक स्वच्छता आणि इतर नागरी विषयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

महापौरांनी स्पष्ट केले की, पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून जलनिचरा, मॅनहोल सुरक्षितता आणि नागरी सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0