मुसळधार पावसात आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ; प्रभाग १६४ मधील आपत्कालीन परिस्थितीवर सातत्याने लक्ष
मुंबईतील मुसळधार पावसामुळे प्रभाग १६४ मध्ये झाडे कोसळण्याच्या घटनांनंतर आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत घटनास्थळांना भेट देत मदतकार्याचा आढावा घेतला. कुर्ल्यातील दुर्घटनेनंतर महापौर रितूताई तावडे यांनीही भेट देऊन मृताच्या कुटुंबीयांना ५ लाखांच्या मदतीची घोषणा केली.
मुंबई ब्यूरो | अनिल सावरे
मुंबई | ५ जुलै २०२६ : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये झाडे कोसळण्याच्या घटना घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक १६४ चे स्थानिक नगरसेवक तथा आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत विविध घटनास्थळांना भेट देत मदतकार्याचा आढावा घेतला आणि प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविल्या.
आज सकाळी कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात झाड कोसळून ६३ वर्षीय युनूस कोंदावाला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हरिष भांदिर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. त्यानंतर मुंबईच्या प्रथम नागरिक तथा महापौर रितूताई तावडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.
दिवसभर प्रभागातील विविध भागांमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवत असतानाच रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कोहिनूर रोडवरील एचडीआयएल संकुल, हरी हरेश्वर मंदिरासमोर मोठे झाड उन्मळून पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दूरध्वनीद्वारे दिली.
माहिती मिळताच हरिष भांदिर्गे अवघ्या काही मिनिटांत, रात्री ११.१५ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाशी तात्काळ संपर्क साधला. झाड हटविणे, परिसर सुरक्षित करणे, वाहतुकीतील अडथळे दूर करणे आणि नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी त्यांनी प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणांमध्ये समन्वय साधत मदतकार्याला गती दिली. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम सुरू केले.
दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद दिला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, झाडे, जुन्या इमारती किंवा विद्युत खांबांच्या परिसरात अनावश्यक थांबू नये तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हरिष भांदिर्गे यांनी दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत घटनास्थळांवर उपस्थित राहून प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधल्याने स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या तत्पर कार्यपद्धतीचे स्वागत करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0