पावसाळ्याचे पुढील तीन महिने अत्यंत महत्त्वाचे; साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – हरिष भांदिर्गे
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या उपस्थितीत पावसाळी आरोग्य आढावा बैठक पार पडली. साथीचे आजार, ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती, डायबिटीस मुक्त मुंबई अभियान आणि बालकांसाठी मोफत श्रवणयंत्र यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
मुंबई | ब्यूरो अनिल सावरे
२ जुलै पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पावसाळ्यातील पुढील तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण, आरोग्य यंत्रणेची पूर्वतयारी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो तसेच हिपॅटायटीस ए आणि ई या साथीच्या आजारांची सद्यस्थिती, रुग्णसंख्या, उपचार व्यवस्था, महानगरपालिका रुग्णालयांतील औषधसाठा आणि आरोग्य सेवांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी 'डायबिटीस मुक्त मुंबई' अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मॅमोग्राफी तपासणी सुरू करण्याचा प्रस्ताव आणि महिलांमधील वाढत्या ब्रेस्ट कॅन्सरच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली.
महिलांमध्ये नियमित तपासणीचे महत्त्व, आजाराचे प्रारंभिक निदान आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबतही बैठकीत सविस्तर विचारविनिमय झाला.
याशिवाय, १ ते ३ वर्षे वयोगटातील ऐकण्याची किंवा बोलण्याची समस्या असलेल्या बालकांना मोफत श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमावरही चर्चा करण्यात आली. अशा बालकांचे वेळेत निदान आणि उपचार होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
मुंबईकरांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर वैद्यकीय तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसमवेत सखोल आढावा घेण्यात आला.
या बैठकीस महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर, आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, मुंबई भाजपचे महामंत्री पवन त्रिपाठी, नगरसेवक प्रतिक करपे, आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह, सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, अधिष्ठात्री आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी पावसाळ्याच्या काळात साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0