विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ शिक्षणप्रवासासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध; 'लालपरी' विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची ज्ञानवाहिनी – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि परवडणाऱ्या शिक्षणप्रवासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 'लालपरी' ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विश्वासू जीवनवाहिनी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठीच्या सवलती, मोफत प्रवास आणि आधुनिक सुविधांची माहिती दिली.
मुंबई प्रतिनिधी नरेश शिंदे
मुंबई | ५ जुलै २०२६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 'लालपरी' ही केवळ प्रवासी वाहतुकीचे साधन नसून राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ अनेक दशकांपासून प्रभावीपणे पार पाडत असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शालेय वेळेत बसस्थानकांवर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यास मदत करतात तसेच प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने सहाय्य मिळावे यासाठी एसटी महामंडळाने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्रही सुरू केले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात दररोज सुमारे ३० हजार १७७ शालेय फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी एसटी महामंडळ विविध सवलतींच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना १०० टक्के मोफत प्रवास दिला जात आहे. याशिवाय शैक्षणिक सहलींसाठी ५० टक्के सवलत, मासिक विद्यार्थी पासवर ६६.६७ टक्के सवलत तसेच उन्हाळी सुट्टी, परीक्षा, शैक्षणिक शिबिरे किंवा आजारी पालकांना भेट देण्यासाठीच्या प्रवासावरही ५० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २५.१३ लाख अहिल्याबाई होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होणार आहे.
याशिवाय कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत आहे. मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ बसेसद्वारे ७३ हजार ६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, "एसटीची 'लालपरी' ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानवाहिनी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्यासाठी एसटी महामंडळ अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करत राहील."
राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात एसटी महामंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असून सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी प्रवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महामंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0