नेताजी नगर येथे डोंगराचा काही भाग कोसळला; मदत व बचावकार्य युद्धपातळीवर, हरिष भांदिर्गे यांची घटनास्थळी धाव
मुंबईतील वॉर्ड क्र. १६४ मधील नेताजी नगर परिसरात डोंगराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी घटनास्थळी भेट देत मदत व बचावकार्याचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई | ३ जुलै २०२६
मुंबईतील वॉर्ड क्र. १६४ अंतर्गत नेताजी नगर, जय दुर्गा सोसायटी, हनुमान मंदिर परिसरात आज पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले असून, आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
घटनास्थळी भेट देऊन हरिष भांदिर्गे यांनी संबंधित आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय साधला. परिसराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
घटनास्थळी एल प्रभागातील इमारत व कारखाने विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. चव्हाण, कुर्ला अग्निशमन केंद्राचे अधिकारी श्री. पवार, साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मांदले तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाने घटनास्थळी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात केली असून परिसरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0