कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्वनिधी महोत्सव’ उत्साहात; पथविक्रेत्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप, बँकांचा गौरव

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वनिधी महोत्सवात पीएम-स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. पाच वर्षांत जिल्ह्यात ४७,१०८ लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Jul 4, 2026 - 00:30
 0  1
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्वनिधी महोत्सव’ उत्साहात; पथविक्रेत्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप, बँकांचा गौरव
स्वनिधी महोत्सव, कोल्हापूर, पथविक्रेते, कर्ज मंजुरी

कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव 

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM-SVANidhi) योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ‘स्वनिधी महोत्सव’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथविक्रेत्यांचा आणि बँकांचा गौरव करण्यात आला.

स्वनिधी महोत्सवाचा उद्देश पथविक्रेत्यांच्या यशोगाथांचा गौरव करणे, योजनेबाबत जनजागृती वाढविणे, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे, आर्थिक साक्षरता वाढविणे, वित्तीय समावेशनाला चालना देणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे हा होता.

या कार्यक्रमाला कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त देवानंद ढेकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाच वर्षांत ४७ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना कर्ज

योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रातील ४७ हजार १०८ पथविक्रेत्यांना मागील पाच वर्षांत बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये २८ हजार ५१६ लाभार्थ्यांनी प्रथम कर्ज, १३ हजार ४४८ लाभार्थ्यांनी द्वितीय कर्ज, तर ५ हजार १४४ लाभार्थ्यांनी तृतीय कर्जाचा लाभ घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

डिजिटल व्यवहार आणि अन्न सुरक्षा विषयक मार्गदर्शन

इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी केंद्र शासनाची ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून अधिकाधिक पथविक्रेत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे उमेश भुसे यांनी अन्न सुरक्षा कायद्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच व्यवस्थापक निवास कोळी यांनी पीएम-स्वनिधी लाभार्थ्यांसाठी क्रेडिट कार्ड सुविधा आणि डिजिटल पेमेंट प्रणालीबाबत सादरीकरण केले.

लाभार्थी आणि बँकांचा गौरव

कार्यक्रमात मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पीएम-स्वनिधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून व्यवसायात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या पथविक्रेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याशिवाय, लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल विविध बँकांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विजय तळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0