लोकोपयोगी कामे करून ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. शासकीय योजनांची व्यापक प्रसिद्धी करून अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा आणि लोकोपयोगी कामांवर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.
प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. १६ : ‘सेवा संकल्प अभियान’ांतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांची व्यापक प्रसिद्धी करून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. तसेच अभियानाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामांना प्राधान्य देऊन हे अभियान प्रभावीपणे आणि यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी अभियानाचे काटेकोर नियोजन करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय योजनांची प्रभावी प्रसिद्धी करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, यासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अभियानांतर्गत २०११ पर्यंतच्या शासकीय जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणांचे नियमानुकूल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच येत्या १ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
वृक्षलागवड, आरोग्य तपासणी आणि अवयवदानावर भर
‘३०० कोटी वृक्ष लागवड’ कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना अवयवदानासाठी अर्ज करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांच्या आधारे उत्कृष्ट यशोगाथा तयार करून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम
सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजनांवर आधारित मानवी व रंगीत रांगोळ्यांचे सादरीकरण करण्याबरोबरच विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्यासाठी बळीराजा शेत रस्ते व पाणंद रस्त्यांची कामे, तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी यावरही भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा
अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळांमध्ये चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रम तसेच कलापथक आणि नाट्यपथकांच्या माध्यमातून शाळा व ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे.
‘चला शाळेत जाऊया’ या उपक्रमांतर्गत शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक सुविधा, उपलब्ध सोयी-सुविधा आणि गुणवत्तेची पाहणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा या उपक्रमात राज्यात अग्रेसर असून, देशातही अग्रेसर होण्यासाठी सर्व विभागांनी प्रभावीपणे काम करावे. अभियानात केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता प्रत्यक्ष लोकोपयोगी कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी केले.
विविध उपक्रमांचे आयोजन
जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी सादरीकरणाद्वारे अभियानांतर्गत विविध विभागांनी राबवावयाच्या कार्यक्रमांची माहिती दिली.
या अभियानात सेवा सेतू अभियान, इनोव्हेशन चॅलेंज, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवाज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, रांगोळी, नमो सेवागाथा, जल-जन-सेवा संकल्प यात्रा आणि जनसेवक महाकुंभ यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
बैठकीदरम्यान विविध विभागांच्या प्रमुखांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची तसेच करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती उपस्थितांना दिली.