राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, शिक्षण आणि लोककल्याणाचा लोकोत्तर राजा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, सहकार, शेती, उद्योग, क्रीडा आणि कला क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा घेतलेला आढावा.

Jun 26, 2026 - 20:42
 0  3
राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, शिक्षण आणि लोककल्याणाचा लोकोत्तर राजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शाहू महाराज जयंती, शाहू महाराज कार्य,

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २६ जून : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ कोल्हापूर संस्थानाचे राजे नव्हते, तर बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणारे दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते. २६ जून १८७४ रोजी जन्मलेल्या शाहू महाराजांनी आपल्या अल्प कारकीर्दीत शिक्षण, शेती, उद्योग, सहकार, क्रीडा, कला आणि सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले.

शाहू महाराजांनी जात, धर्म आणि पंथ यांच्यात भेदभाव न करता सर्व समाजघटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. जैन, मुस्लिम, लिंगायत, ब्राह्मण तसेच इतर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करून सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला. वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.

सामाजिक सलोखा आणि सुधारणा

हिंदू-मुस्लिम ऐक्य दृढ करण्यासाठी शाहू महाराजांनी सातत्याने प्रयत्न केले. विविध धर्मीयांच्या कला आणि संस्कृतीला राजाश्रय देत सामाजिक सलोखा मजबूत केला. अनेक सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करून समानतेवर आधारित समाजव्यवस्था उभारण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

शेती, उद्योग आणि सहकाराला चालना

शेती क्षेत्राच्या विकासासाठी राधानगरी धरणाची उभारणी करून सिंचन व्यवस्थेला बळकटी दिली. या धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांतीचा पाया रचला गेला. शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून शाहूपुरी आणि जयसिंगपूर येथे बाजारपेठा विकसित करण्यात आल्या.

उद्योग क्षेत्रात १९०६ मध्ये छत्रपती शाहू मिलची स्थापना करून औद्योगिकीकरणाला चालना दिली. सहकार क्षेत्रात १९१२ मध्ये सहकारी संस्था विषयक कायदा लागू करून महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा मजबूत पाया घातला.

शिक्षण आणि कामगार हिताचे धोरण

शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासोबतच कामगारांच्या संघटनांना प्रोत्साहन दिले. स्वावलंबन, संघटन आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित धोरणांमुळे कामगार आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडून आली.

कला, क्रीडा आणि संस्कृतीचे संवर्धन

कुस्ती, संगीत, नाट्य आणि विविध कलांना शाहू महाराजांनी उदार राजाश्रय दिला. अनेक कलावंत, नाट्यसंस्था आणि मल्लविद्येला त्यांनी आर्थिक व नैतिक पाठबळ दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला.

लोकाभिमुख राजा

साधी राहणी, सर्वसामान्यांशी आत्मीयतेने वागण्याची वृत्ती आणि लोककल्याणाची तळमळ यामुळे शाहू महाराज जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले. ते राजवाड्यापुरते मर्यादित न राहता सामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेत असत.

६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि प्रगतिशील राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. आजही त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समाजाला प्रेरणा देत असून, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

– फारुख बागवान

माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0