सामाजिक न्याय दिनानिमित्त कोल्हापुरात शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित समता दिंडीत हजारो नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले.

Jun 26, 2026 - 21:12
 0  5
सामाजिक न्याय दिनानिमित्त कोल्हापुरात शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सामाजिक न्याय दिन, समता दिंडी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज

जिल्हा प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : "लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!" या जयघोषाने दसरा चौक परिसर दुमदुमून गेला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौक येथे समता दिंडी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

समता दिंडीचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी पालकमंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी समता दिंडीतील पालखीला खांदा देत शाहू महाराजांना अभिवादन केले.

कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा सुषमा सातपुते, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी अमित घवले, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री जाधव तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवरांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाची तत्त्वे प्रत्यक्षात आणली. मागासवर्गीय, दिव्यांग, वृद्ध, निराधार आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे यावेळी स्मरण करण्यात आले.

समता दिंडीने व्हीनस कॉर्नर, माईसाहेब पुतळा, बिंदू चौक येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर महानगरपालिका परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंगाराम कांबळे स्मारक येथे अभिवादन करून सीपीआर मार्गे दसरा चौक मैदानात दिंडीची सांगता झाली.

समता दिंडीत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी, निवासी शाळा, आश्रमशाळा, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम पथके, हलगी वादन तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथांनी दिंडीचे आकर्षण वाढविले. महामानवांच्या साहित्याने सजविलेली ग्रंथपालखीही विशेष लक्षवेधी ठरली.

याशिवाय विविध शासकीय व निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, तृतीयपंथी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर रुग्णालय, वाहतूक शाखा, महानगरपालिका स्वच्छता विभाग, पत्रकार, एनएसएस व एनसीसी स्वयंसेवक, विविध तालमी, तरुण मंडळे आणि बचतगटांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी सर्व सहभागींचे आभार मानले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0