कोल्हापुरात जिल्हा कौशल्य विकास विभागाचा रोजगार मेळावा; युवकांना रोजगारक्षम बनविण्यावर तज्ज्ञांचा भर

कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' अंतर्गत TPO-HR Meet आयोजित करण्यात आला. उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकास आणि रोजगारक्षम युवक घडविण्यावर तज्ज्ञांनी भर दिला.

Jun 30, 2026 - 23:34
 0  2
कोल्हापुरात जिल्हा कौशल्य विकास विभागाचा रोजगार मेळावा; युवकांना रोजगारक्षम बनविण्यावर तज्ज्ञांचा भर
कोल्हापूर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मेळावा,

कोल्हापूर प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर  : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत TPO-HR Meet कार्यक्रम उत्साहात पार पडला. उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्य विकास आणि युवकांना रोजगारक्षम बनविण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम, कॅम्पस संचालक अभिजीत माने, युवा शक्ती स्किल इंडिया प्रा. लि.चे संचालक डॉ. सतीश पवार, ज्येष्ठ उद्योजक शाम तोतला, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. चेळे, जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे, बालाजी बिराजदार यांच्यासह विविध उद्योग क्षेत्रातील एचआर प्रतिनिधी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. एस. डी. चेळे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून योग्य अभ्यासक्रमाची निवड करावी तसेच रोजगारासाठी आवश्यक अतिरिक्त कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले.

कॅम्पस संचालक अभिजीत माने यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अभ्यासक्रमात आवश्यक बदल करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

युवा शक्ती स्किल इंडिया प्रा. लि.चे संचालक डॉ. सतीश पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. युवकांना उद्योगांसाठी रोजगारक्षम बनविण्याचे काम संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.

एचआर प्रतिनिधी संग्राम देशमुख यांनी रोजगार मेळाव्यांबाबत पालकांचेही प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तर सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी शासनाच्या रोजगार धोरणाचा आणि युवकांच्या कौशल्याचा समन्वय साधून भविष्यातही अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाला जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील, मकरंद काईंगडे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आवटे, विविध प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी (TPO), एचआर प्रतिनिधी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारंग कापूरकर, सूत्रसंचालन नेहा जाधव, तर आभार प्रदर्शन सुदर्शन सुतार यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0