कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवा : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन
केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले. साक्षरता ही केवळ मोहीम नसून सामाजिक चळवळ बनावी, यासाठी महाविद्यालयीन युवकांचा सहभाग वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २४ (जिमाका) : केंद्र सरकार पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत संपूर्ण कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित जिल्हास्तरीय नियामक परिषदेच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. जॅसमिन यांनी सांगितले की, केवळ निरक्षरांना साक्षर करणे हेच या मोहिमेचे उद्दिष्ट नसावे, तर नवसाक्षरता ही एक व्यापक सामाजिक चळवळ म्हणून राबविण्यात यावी. यासाठी महाविद्यालयीन युवकांची मदत घेण्याची आवश्यकता असून, मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीत युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
ही मोहीम विहित कालावधीत पूर्ण झाल्यानंतर सहभागी महाविद्यालयीन युवकांना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील सर्व गावांचा साक्षरतेच्या दृष्टीने गावनिहाय डेटा तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारच्या या योजनेची सुरुवात २०२२ मध्ये झाली असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण ४६ हजार २५२ निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये विभागून देण्यात आले आहे.
बैठकीस जिल्हा सांख्यिकी विभागाच्या उपायुक्त सीमा अर्दाळकर, महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रतिनिधी विजय माळी, माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी चंद्रशेखर ओतारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याने राज्याला नेहमीच सकारात्मक दिशा दिली असून साक्षरतेच्या क्षेत्रातही आदर्श निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन डॉ. जॅसमिन यांनी यावेळी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0