'एल निनो'च्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला गती; नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे तातडीने दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एल निनो'मुळे संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविणे, कमी कालावधीत पूर्ण होणारी कामे हाती घेणे आणि जलस्रोत बळकटीकरणावर भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.

Jun 30, 2026 - 22:15
 0  3
'एल निनो'च्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला गती; नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे तातडीने दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
देवेंद्र फडणवीस, एल निनो, जलसंधारण, कोल्हापुरी बंधारे

कोल्हापूर प्रतिनिधी : उमेश जाधव 

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात 'एल निनो' चा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन राज्य शासनाने जलसंधारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती टाळण्यासाठी कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच राज्यातील नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष धडक मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विविध हवामान संस्थांनी 'एल निनो'चा इशारा दिल्यामुळे शासन पूर्णपणे सज्ज असून, या संभाव्य संकटाकडे जलसंधारणाची संधी म्हणून पाहिले पाहिजे. नवीन जलसंधारण प्रकल्प हाती घेण्याऐवजी सुरू असलेली आणि अल्पावधीत पूर्ण होणारी कामे तसेच दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राज्यातील नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी धातूविरहित आणि कायमस्वरूपी पर्यायांचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितले. तसेच या कामांसाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट जबाबदारी देण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला राज्यातील पूर्वीच्या गंभीर दुष्काळग्रस्त भागांचा अभ्यास करून त्या वेळी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यास सांगितले. त्याआधारे यंदाच्या संभाव्य परिस्थितीसाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जलस्त्रोतांचे बळकटीकरण, ग्रामीण भागातील सौर ऊर्जा प्रकल्पांचे वितरण, सौर उपकरणांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.

सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या कृषी क्षेत्रात विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वीज फिडरवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी फिडर व्यवस्था विकसित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

राज्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची स्थिती

राज्यात जलसंपदा विभागाकडे ९७६, तर मृद व जलसंधारण विभागाकडे १,३६७ असे एकूण २,३४३ कोल्हापुरी बंधारे आहेत. नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर राज्यात २ लाख ३९ हजार १८१ हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0