एल निनोच्या पार्श्वभूमीवर चारा उत्पादन कार्यक्रम; पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे
संभाव्य चारा टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादन कार्यक्रम हाती घेतला आहे. पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाण्यांचे वितरण करण्यात येणार असून तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव
कोल्हापूर : राज्यात मान्सून 2026 वर एल निनो या हवामान घटकाचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुधन संरक्षणासाठी विशेष चारा उत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे. जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुपालकांनी उपलब्ध जमिनीवर जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याची लागवड करावी, चारा साठवणुकीवर भर द्यावा तसेच मुरघास निर्मितीचा अवलंब करावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
शेतकरी आणि पशुपालकांना सकस हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी 100 टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत वैरण बियाण्यांसाठी मागणी अर्ज तातडीने सादर करावेत.
पशुधनाचे संरक्षण आणि दुष्काळजन्य परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0