संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष पाहणी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पालखी मार्ग आणि विसावा ठिकाणांची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

Jul 5, 2026 - 21:59
 0  2
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष पाहणी
पिंपरी चिंचवड महापालिका, संत तुकाराम महाराज पालखी, डॉ विजय सूर्यवंशी

पुणे | प्रतिनिधी | रोहन सोनाळे 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि पालखी सोहळा शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालखी मार्ग आणि विविध विसावा स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, प्रभाग अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, वैशाली ननावरे, विजय भोजने, उमेश मोने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळी भक्ती-शक्ती चौकातून पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानंतर विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, पालखी तळ, दर्शन रांगा आणि मंडप व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

पालखी मार्गावर अनधिकृत टपऱ्या किंवा रस्त्यावरील लहान व्यावसायिकांमुळे भाविकांच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पालखी विसावा स्थळांवरील मेट्रोचे बॅरिकेड्स हटवून प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था सक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला.

पावसाळ्याचा विचार करून विसावा स्थळांवर चिखल होऊ नये यासाठी तातडीने खडी टाकण्याचे निर्देश देण्यात आले. आकुर्डीतील खंडोबा चौक परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे पालखीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची खातरजमा करून रस्त्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि इतर आवश्यक कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

त्यानंतर दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची पाहणी करून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. मात्र, आवश्यक त्या सुधारणा तातडीने पूर्ण करून स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालखी सोहळा हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा आणि भक्तीशी निगडित असल्याचे सांगत, महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0