पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विकासकामांसह आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांवरील महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य, शिक्षण, जलनिस्सारण, अग्निशमन, संगणक प्रशिक्षण, शाळांची दर्जोन्नती आणि महिला बचत गटांना रोजगार यांसह विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून मराठी शाळांची गुणवत्ता वाढविण्यासह विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती

Jul 2, 2026 - 05:13
 0  2
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विकासकामांसह आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांवरील महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी | दि. १ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक बैठक आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा आणि विविध पायाभूत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीनंतर माहिती देताना सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून मराठी शाळांची दर्जोन्नती, आरोग्य साहित्याची उपलब्धता, महिलांसाठी आरोग्यविषयक साहित्य तसेच पर्यावरण आणि पर्यटनाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याणकारी उपक्रमांतर्गत विविध विकासकामांनाही गती दिली जाणार आहे.

बैठकीत आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आवश्यक औषधे, उपभोग्य साहित्य आणि ऑर्थोपेडिक साहित्य खरेदीस मंजुरी देण्यात आली. तसेच विविध औषधांच्या खरेदीलाही हिरवा कंदील देण्यात आला.

औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी अंतर्गत MS-CIT उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली. या माध्यमातून महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या जमातीतील लाभार्थ्यांना केवळ १० टक्के शुल्कात, तर ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना फक्त ५ टक्के शुल्कात संगणक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शहरातील झोपडपट्टी भागात सेवाशुल्क बिले वाटप आणि जनजागृतीचे काम महिला बचत गटांकडे सोपविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २० मधील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छता कामांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.

रावेत येथील एक्सप्रेस फिडरवर अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविणे, 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिस्सारणाची कामे तसेच सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीची देखभाल व दुरुस्ती यांसाठीही मंजुरी देण्यात आली.

शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंप हाऊसमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक अग्निशामक उपकरणे बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला. या उपाययोजनांमुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, स्थायी समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अभिषेक बारणे म्हणाले की, स्थायी समितीच्या बैठकीत जनहिताच्या सर्व महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे. आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रांवर विशेष भर देत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. औषध खरेदी, मराठी शाळांची दर्जोन्नती, महिला बचत गटांना रोजगार आणि दिव्यांग तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणातील सवलत यांसारखे निर्णय सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणारे आहेत. या निर्णयांची वेळेत प्रभावी अंमलबजावणी झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडेल.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0