पिंपरी-चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी; चेतन पवार यांचा दावा
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबत ठाम असल्याचा दावा शहरप्रमुख चेतन पवार यांनी केला. शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
पुणे प्रतिनिधी | रोहन सोनाळे
पिंपरी, पुणे | २ जुलै २०२६
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठामपणे उभे असल्याचा दावा शहरप्रमुख चेतन पवार यांनी केला.
गुरुवारी (२ जुलै) सकाळी चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिकांनी मुंबईतील मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत पक्षाशी आपली निष्ठा कायम असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरातील एकही शिवसैनिक किंवा पदाधिकारी पक्ष सोडणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चेतन पवार यांनी सांगितले की, शहरातील शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या चर्चांना या भेटीनंतर पूर्णविराम मिळाला आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत शाखा आणि बूथस्तरावर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यात येणार असून जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचे अभियानही राबविण्यात येणार आहे.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवश्यकतेनुसार रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासह जनहिताच्या मुद्द्यांवर अधिक जोमाने काम करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती चेतन पवार यांनी दिली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0