पिंपरी चिंचवडमध्ये ‘चाइल्ड फ्रेंडली बस’चा शुभारंभ; बालकांच्या हक्कांबाबत जनजागृतीवर भर

पिंपरी चिंचवडमध्ये बालकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘चाइल्ड फ्रेंडली बस’ उपक्रमाचा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते

Sep 17, 2026 - 23:28
 0  5
पिंपरी चिंचवडमध्ये ‘चाइल्ड फ्रेंडली बस’चा शुभारंभ; बालकांच्या हक्कांबाबत जनजागृतीवर भर
पिंपरी चिंचवडमध्ये ‘चाइल्ड फ्रेंडली बस’चा शुभारंभ

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पिंपरी चिंचवड, दि. १५ सप्टेंबर २०२६ : बालकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारातून ‘चाइल्ड फ्रेंडली बस’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली, विशेष बाल पोलीस पथक आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते ‘चाइल्ड फ्रेंडली बस’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य शुभांगी तांबट तसेच होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. कॅरोलिन उपस्थित होत्या.

बालकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती

यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बालकांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करण्याची गरज व्यक्त केली. बालकांसाठी सुरक्षित, संवेदनशील आणि बालस्नेही शहर निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘चाइल्ड फ्रेंडली बस’च्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये बाल हक्क संरक्षण, सुरक्षित बालपण आणि बालकांशी संबंधित जनजागृती करण्यात येणार आहे. बालकांना त्यांच्या हक्कांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘चाइल्ड फ्रेंडली बस’मधून जनजागृती अभियान

कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘चाइल्ड फ्रेंडली बस’च्या जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

ही बस पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये फिरून बाल हक्क संरक्षण, सुरक्षित बालपण आणि बालकांशी संबंधित विविध विषयांवर जनजागृती करणार आहे. बालस्नेही शहर निर्माण करण्यासाठी तसेच समाजामध्ये बाल हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पोलीस अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित

या कार्यक्रमासाठी पोलीस सह-आयुक्त यशवंत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सरंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गणेश इंगळे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) धीरज पाटील, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष बाल पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधीही कार्यक्रमास उपस्थित होते. बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे बाल हक्क आणि बाल संरक्षणाबाबत जनजागृतीला चालना मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.