उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र; यवतमाळात २९ एप्रिल रोजी भव्य एल्गार मोर्चा
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात यवतमाळमध्ये २९ एप्रिल रोजी भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उपवर्गीकरण विरोधी कृती संघर्ष समितीने हा निर्णय आरक्षण व्यवस्थेला धक्का देणारा असल्याचा आरोप केला आहे.
रवि वाघमारे जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
यवतमाळ : अनुसूचित जातींच्या (SC) उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात यवतमाळ शहरात बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय बदल नसून आरक्षणाच्या मूळ चौकटीला धक्का देणारा आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.
संविधानाच्या चौकटीला धोका असल्याचा आरोप
उपवर्गीकरण विरोधी कृती संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले की, संविधानानुसार अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षण व्यवस्थेची मूलभूत रचना अबाधित ठेवणे अपेक्षित आहे. मात्र उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षणात कप्पे निर्माण करून विविध घटक जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे.
समितीच्या मते, कोणताही अधिकृत अहवाल जाहीर न करता ही प्रक्रिया राबवली जात असून त्यामुळे संविधानिक हक्कांवर गदा येत आहे.
फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
हा मोर्चा २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले पुतळा, आझाद मैदान, यवतमाळ येथून सुरू होणार आहे. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
सर्व घटक जातींना सहभागाचे आवाहन
अनुसूचित जातीमधील सर्व ५९ घटक जातींनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाज एकसंध असून हक्कांसाठी एकत्र लढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेतही समितीने दिले आहेत.
आयोजकांची भूमिका
“हे केवळ उपवर्गीकरणापुरते मर्यादित नसून आरक्षणाची मूळ संकल्पना कमकुवत करण्याचे षडयंत्र आहे. समाजाने वेळीच सावध होऊन संघटित लढा देणे ही काळाची गरज आहे,” असे मत उपवर्गीकरण विरोधी कृती संघर्ष समिती, यवतमाळ यांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

