वीज कोसळून तरुणाचा करुण अंत; उमरखेडमध्ये माय-लेक गंभीर भाजले

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतमालक महिला आणि तिचा मुलगा गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

May 7, 2026 - 23:15
 0  6
वीज कोसळून तरुणाचा करुण अंत; उमरखेडमध्ये माय-लेक गंभीर भाजले
यवतमाळ बातम्या, उमरखेड वीज दुर्घटना, वीज कोसळून मृत्यू

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवि वाघमारे 

यवतमाळ : विदर्भात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केला असून उमरखेड तालुक्यात वीज कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत शेतमालक महिला आणि तिचा मुलगा गंभीर भाजले गेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ही घटना उमरखेड येथील शिवाजीनगर शिवारात घडली. श्रीनिवास देविदास राठोड (वय ३२) हा तरुण ज्वारी काढणीचे यंत्र घेऊन शेतात कामासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पावसापासून बचाव करण्यासाठी श्रीनिवास जवळील आंब्याच्या झाडाखाली उभा राहिला. मात्र काही क्षणातच त्या झाडावर जोरदार वीज कोसळली. विजेचा धक्का इतका तीव्र होता की श्रीनिवासचा जागीच मृत्यू झाला.

याचवेळी शेतमालक नंदाबाई जीवन आडे (वय ३८) आणि त्यांचा मुलगा यश जीवन आडे (वय १७) हे देखील त्या झाडाच्या दिशेने येत होते. वीज कोसळल्याने निर्माण झालेल्या तीव्र झटक्यात दोघेही गंभीररीत्या भाजले गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, उमरखेड-खंडाळा परिसरातही वीज कोसळून एका पाच वर्षांच्या म्हशीचा मृत्यू झाला. शेतकरी हिरामण भुजंगा दुधेवार यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आर. यू. सुरडकर यांनी तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0