पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी ताडी निर्मितीवर पोलिसांचा छापा; ४०० लिटर ताडी जप्त, दोघांना अटक
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे कारवाई करत क्लोरल हायड्रेट या रसायनाचा वापर करून तयार करण्यात येणारी ४०० लिटर विषारी ताडी जप्त केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दारूबंदी पथकाने मोठी कारवाई करत ट्रान्सपोर्ट नगर, निगडी परिसरात तयार करण्यात येणारी रासायनिक भेसळयुक्त विषारी ताडी जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे ४०० लिटर विषारी ताडी तसेच ताडी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ आणि साहित्य जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात अवैध दारू, भेसळयुक्त मद्य आणि ताडी निर्मितीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे दारूबंदी पथकाने ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे छापा टाकला. तपासादरम्यान क्लोरल हायड्रेट (Chloral Hydrate) या रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम आणि विषारी ताडी तयार करून विक्री केली जात असल्याचे उघड झाले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान ४०० लिटर रासायनिक भेसळयुक्त विषारी ताडी जप्त करण्यात आली. तसेच ताडी निर्मितीसाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ आणि इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोन आरोपींना अटक
या प्रकरणात पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे:
मौनेश यंकप्पा गुट्टेदार (वय २४, मूळ रा. रायचूर, कर्नाटक)
लक्ष्मण गुंडप्पा हुलसुरे (वय २६, मूळ रा. निलंगा, जि. लातूर)
दोन्ही आरोपींविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली करीत आहेत.
आरोग्यास गंभीर धोका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली ताडी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून तिच्या सेवनामुळे गंभीर शारीरिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर मद्य विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

