ऑनलाईन लोन अॅपद्वारे धमकी देत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेकडून ६ आरोपी अटकेत
ऑनलाईन लोन अॅपच्या माध्यमातून नागरिकांना धमकावून, मानसिक त्रास देऊन आणि बदनामीची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. २६ मे २०२६ : ऑनलाईन लोन अॅपच्या माध्यमातून नागरिकांना धमकावून, बदनामीची भीती दाखवून आणि मानसिक त्रास देत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी २५ मे २०२५ रोजी एका ऑनलाईन लोन अॅपवरून २२ हजार ५० रुपये कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रिया पूर्ण करताना संबंधित अॅपकडून पुरविण्यात आलेल्या एपीके फाईलद्वारे आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईलमधील काही माहिती आणि संपर्क यादीवर प्रवेश मिळविला.
फिर्यादी यांनी घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज पूर्णपणे भरूनही त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वारंवार फोन येण्यास सुरुवात झाली. आरोपींकडून धमक्या देण्यात येत होत्या. तसेच नातेवाईक, मित्र, कार्यालयातील अधिकारी आणि व्यावसायिक संपर्कांना फोन करून फिर्यादींची बदनामी केली जात होती.
याशिवाय, “कुटुंबाची सुरक्षितता हवी असेल आणि त्रास थांबवायचा असेल तर आम्ही सांगतो त्या अॅपवरून पुन्हा कर्ज घ्या,” अशी धमकी आरोपींकडून देण्यात येत होती. या दबावामुळे फिर्यादींना विविध १८ ऑनलाईन लोन अॅपवरून तब्बल ७ लाख ५ हजार ५७० रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडण्यात आले.
फिर्यादी नियमितपणे कर्ज आणि व्याज भरत असूनही आरोपींकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती. “वन टाईम सेटलमेंट”च्या नावाखाली अतिरिक्त रक्कम उकळण्याचाही प्रयत्न करण्यात येत होता.
वारंवार होणारे फोन, मेसेज, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसमोर होणारी बदनामी यामुळे फिर्यादींची मानसिक स्थिती गंभीररीत्या खालावली होती. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर गुन्हे शाखेने २५ मे २०२६ रोजी सापळा रचून फिर्यादींकडून खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या सहा आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान या टोळीने फिर्यादीप्रमाणे इतर अनेक नागरिकांनाही ऑनलाईन लोन अॅपच्या माध्यमातून त्रास देत आर्थिक उकळपट्टी केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून ३० मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सायबर माध्यमातून वाढणाऱ्या आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी ऑनलाईन लोन अॅप वापरताना अधिक सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

