पंचवटीतील ज्वेलर्स दुकान दरोडा प्रकरणाचा उलगडा; पंजाबमधून दोन आरोपींना अटक
नाशिकच्या पंचवटी परिसरातील न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना नाशिक गुन्हे शाखेने पंजाबमधील मोहाली येथून अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला.
नाशिक ब्युरो
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी भागात असलेल्या न्यू समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून ऐवज लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. या दोन्ही आरोपींना पंजाब राज्यातील मोहाली येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
15 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुकानातील महिला मालक आणि कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत प्रतिकार केल्यामुळे आरोपींना ऐवज लुटण्यात अपयश आले.
या घटनेदरम्यान आरोपींनी एका कर्मचाऱ्यावर पिस्तुलाच्या बटने हल्ला करून त्याला जखमी केले होते. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नाशिक गुन्हे शाखेचे युनिट 1 आणि युनिट 2 यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. पोलिसांनी तब्बल 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, पंजाबमधील मोहाली भागातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
हानीश कुमार महेंद्रसिंग (वय 47)
रणजीत सिंग दर्शन सिंग (वय 52)
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांची ओळख अंबाला कारागृहात झाली होती. त्यानंतर त्यांनी लुटीचा कट रचला.
आरोपी प्रथम मुंबईत आले आणि त्यानंतर नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिकमध्ये त्यांनी काही दिवस रेकी करून हिरावाडी परिसरातील न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानाची निवड केली. दरोडा टाकल्यानंतर सहज पलायन करता येईल, या उद्देशाने त्यांनी हे ठिकाण निवडल्याचे तपासात समोर आले आहे.
दरोड्याच्या आधी आरोपींनी दोन मोटारसायकली चोरी केल्या होत्या. याच चोरीच्या वाहनांचा वापर करून त्यांनी गुन्हा करण्याचा प्रयत्न केला.
कोणताही ठोस पुरावा हाती नसताना केवळ तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि पोलिसांच्या अथक परिश्रमातून गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0