मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; विदेशी बनावटीची ३ बेकायदेशीर पिस्तुले आणि ४५ जिवंत काडतुसे जप्त, तीन आरोपी जेरबंद
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने मोठी कारवाई करत विदेशी बनावटीची ३ बेकायदेशीर पिस्तुले, मॅगझीन आणि ४५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील दोन आरोपी २०२२ पासून खून प्रकरणात फरार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. २३ मे २०२६ : मुंबई शहरात परराज्यातून विदेशी बनावटीची बेकायदेशीर अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणणाऱ्या तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने अटक केली आहे. आरोपींकडून ३ विदेशी बनावटीची पिस्तुले, मॅगझीन आणि ४५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, काही व्यक्ती विनापरवाना अग्निशस्त्रे विक्री करण्यासाठी २२ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १०:४५ वाजता सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ, पी. डी. मेलो रोड परिसरात येणार आहेत.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सीएसएमटी परिसरातील ईस्टर्न फ्री वेकडे जाणाऱ्या मार्गावर तीन संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीची ३ पिस्तुले, मॅगझीन आणि ४५ जिवंत काडतुसे आढळून आली.
तपासात आरोपींकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही समोर आले. याप्रकरणी मा. र. आ. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडून सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी २०२२ सालापासून खून प्रकरणात फरार असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

