मोक्का गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार अरविंद सोंडा गँगच्या सदस्याला अटक
मानखुर्द पोलिसांनी मोक्का गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेल्या अरविंद सोंडा गँगच्या सदस्याला अटक केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
मुंबई, दि. २८ ऑगस्ट : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का (MCOCA) अंतर्गत दाखल गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या अरविंद सोंडा गँगच्या एका सदस्याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण, स्थानिक बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि पोलिसांच्या सतर्कतेच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
मानखुर्द पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अशफाक ए. शामशुद्दीन खान उर्फ बाब्बू, वय ३९ वर्षे, हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा
सदर आरोपीला अटक टाळण्यासाठी तो मागील सहा महिन्यांपासून आपले अस्तित्व लपवत होता. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर तसेच सोशल मीडिया अकाउंटचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता.
यादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी कल्याण परिसरात स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या वास्तव्याच्या ठिकाणाची खात्री करण्यात आली.
पोलिसांनी सापळा रचून केली अटक
आरोपी राहत असलेल्या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली. तो पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस पथकाने शिताफीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर आरोपीला मा. विशेष सत्र न्यायालय, मोक्का कोर्ट, मुंबई येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ८ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त, पूर्व परिमंडळ-१ समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग प्रमोद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिलाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदलाल पाटील, पोउपनि अजय गोहिलकर, पोउपनि गिरीश माळवे, पोलीस शिपाई रोहित पाटील, रोहित बाड, दत्तात्रय केदार, प्रविण घाडगे, प्रविण पाटील तसेच मपोशि कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मोक्का गुन्ह्यात दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0