खार पोलिसांची मोठी कारवाई; 19 वर्षांपासून न्यायालयाला चकवा देणारा फरार आरोपी जेरबंद
सन 2007 मधील चोरीच्या गुन्ह्यातील आणि तब्बल 19 वर्षांपासून न्यायालयाच्या सुनावणीपासून दूर राहिलेल्या फरार आरोपीला खार पोलिसांच्या विशेष पथकाने माहिम परिसरातून अटक केली. आरोपीविरुद्ध न्यायालयाने जाहीरनामाही जारी केला होता.
मुंबई | ब्यूरो अनिल सावरे
खार पोलीस ठाण्याच्या विशेष निगराणी व तडीपार पथकाने तब्बल 19 वर्षांपासून न्यायालयाच्या सुनावणीस गैरहजर राहून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हनिफ मुराद फकीर (वय 42) याला माहिम दर्गा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनिफ मुराद फकीर हा माहिम (पश्चिम) येथील मोरी रोड परिसरातील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात सन 2007 मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा क्रमांक 84/2007 अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम 379 आणि 34 नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी बांद्रा (पूर्व) येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, 09 वे न्यायालयात सुरू होती. मात्र आरोपी वारंवार न्यायालयात गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जाहीरनामा जारी केला होता. दिनांक 30 जून 2023 रोजी जाहीरनामा क्रमांक 1294/2023 काढण्यात आला होता.
दरम्यान, खार पोलीस ठाण्याचे विशेष निगराणी व तडीपार पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हनिफ मुराद फकीर हा माहिम दर्गा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 7 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता माहिम दर्गा परिसरात सापळा रचला.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी खार पोलीस ठाण्यात आणून अटक केली.
विशेष पथकाची कामगिरी
ही कारवाई खार पोलीस ठाण्याच्या विशेष निगराणी व तडीपार पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक भिमराव धापटे, पोलीस हवालदार गुरव, पोफळे, पवार, माने तसेच पोलीस शिपाई ठोंबरे यांचा समावेश होता.
दीर्घकाळ फरार राहिलेल्या आरोपीला अटक करण्यात आल्याने न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार असून खार पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0