मुंबईत मोबाईल चोरी करणारा सराईत आरोपी अटकेत; ६ स्मार्टफोन जप्त, ५ गुन्ह्यांची उकल

मुंबईतील सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने मोबाईल चोरी करणाऱ्या अहमद जाफर शेख उर्फ अहमद पाया याला अटक केली आहे. आरोपीकडून ६ स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून नागपाडा, पायधुनी, एल. टी. मार्ग, भोईवाडा आणि जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यांतील एकूण ५ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Jun 24, 2026 - 20:32
 0  3
मुंबईत मोबाईल चोरी करणारा सराईत आरोपी अटकेत; ६ स्मार्टफोन जप्त, ५ गुन्ह्यांची उकल
मुंबई मोबाईल चोरी, अहमद जाफर शेख, अहमद पाया, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे

मुंबई ब्यूरो : अनिल सावरे 

मुंबई : सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून एकूण पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून ६ स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अहमद जाफर शेख उर्फ अहमद पाया असे आहे. दिनांक २० जून २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे आणि त्यांचे पथक सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना एक संशयित इसम पोलीस पथकाला पाहून लपण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले.

संशयिताकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोन पंचांच्या उपस्थितीत त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या खिशातून चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या मोबाईलची तपासणी केली असता त्यापैकी एक मोबाईल सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४५१/२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीस गेलेला असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर आरोपीकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्याने मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटकेदरम्यान केलेल्या निवेदन पंचनाम्यातून आरोपीकडून आणखी दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६ स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान आरोपीने नागपाडा, पायधुनी, एल. टी. मार्ग, भोईवाडा आणि सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी खालील गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

१) सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे - गु. र. क्र. ४५१/२६ २) नागपाडा पोलीस ठाणे - गु. र. क्र. ३५५/२६ ३) पायधुनी पोलीस ठाणे - गु. र. क्र. ७३२/२६ ४) एल. टी. मार्ग पोलीस ठाणे - गु. र. क्र. ८३०/२६ ५) भोईवाडा पोलीस ठाणे - गु. र. क्र. २४७/२६

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे, जाधव, पोलीस शिपाई बोडके, भोळे, काळे, धात्रक तसेच तांत्रिक मदतनीस पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0