कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची मोठी कारवाई; ९ आरसीसी इमारतींसह अतिक्रमणांचे निष्कासन

पुणे महापालिकेने कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी राजस सोसायटी परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. या मोहिमेत ९ आरसीसी इमारती, १४ शेड आणि १२ स्टॉल्स हटविण्यात आले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

Jun 6, 2026 - 19:04
 0  3
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची मोठी कारवाई; ९ आरसीसी इमारतींसह अतिक्रमणांचे निष्कासन
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची मोठी कारवाई;

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे : सातारा रस्ता आणि सोलापूर रस्ता यांना जोडणाऱ्या कात्रज-कोंढवा मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण कारवाई करत रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांचे निष्कासन सुरू केले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या उपस्थितीत ही संयुक्त कारवाई पार पडली.

पथ विभाग, बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग तसेच भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त पथकाने राजस सोसायटी परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी बाधित मिळकतींवर कारवाई केली. निखिल मार्बल ते एसबीआय चौक, सुंदरबन या परिसरातील पक्की बांधकामे, अनधिकृत शेड, टपऱ्या आणि स्टॉल्स हटविण्यात आले.

महापालिकेने संबंधित मिळकतधारकांना यापूर्वीच स्वतःहून साहित्य हटविण्यासाठी सुमारे दहा दिवसांचा अवधी दिला होता. त्यानंतरही अतिक्रमणे कायम राहिल्याने कारवाई करण्यात आली. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यापुढे अशा प्रकरणांमध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

कात्रज-कोंढवा रस्त्याचा विकास आराखड्यातील ८४ मीटर रुंदीचा प्रस्ताव असून पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पात मुख्य रस्ता, सर्व्हिस रोड, यू-ड्रेनेज व्यवस्था आणि माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश आहे. तसेच एनएचएआयमार्फत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी आवश्यक सेवा रस्त्यांचे कामही सुरू आहे.

या कारवाईदरम्यान सुमारे ११,५०० चौ.मी. व्यावसायिक आणि १,४१० चौ.मी. निवासी क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये ९ दुमजली आरसीसी इमारती, १४ पत्र्यांची शेड, १२ स्टॉल्स तसेच सीमाभिंतींचे निष्कासन करण्यात आले.

कारवाईसाठी ६ जेसीबी, १४ डम्पर, २ क्रेन, २५ मजूर आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. प्रशासनाने पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0